। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जे.एस.एम. महाविद्यालय अलिबाग येथील महिला विकास कक्ष आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दिनांक 5 मार्च 2022 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी एक दिवसीय स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय कराटेपटू आणि रायगड भूषण पुरस्कार प्राप्त तपस्वी गोंधळी उपस्थित होत्या.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. आजच्या युगात स्वसंरक्षणाची गरज व महत्त्व व त्यांचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन संकटसमयी प्रत्येक महिलेने आपले स्वसंरक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या खंबीर व सक्षम होणे आवश्यक आहे हा मूळ हेतू बाळगून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या सुरुवातीस प्रा.वर्षा पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक तपस्वी गोंधळी यांचा विस्तृत परिचय प्रा.शिल्पा कवळे यांनी उपस्थितांना करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी सदर कार्यशाळेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट करत आजच्या काळात महिला स्वसंरक्षणाची गरज आणि महत्त्व पटवून दिले.सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विविध विषयांचे मिळून 82 विद्यार्थी उपस्थित होते. स्वसंरक्षण संदर्भातील विविध शारीरिक कसरतींचे प्रकार करून दाखवत त्यांचे योग्य ते महत्त्व प्रमुख मार्गदर्शकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले.
या कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, जनता शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष मार्गदर्शन केले. या एक दिवसीय कार्यशाळेसाठी महिला विकास कक्ष समितीमधील प्रा.आशुतोष मेहेंदळे, डॉ.मोहसीन खान, डॉ. जयश्री पाटील, डॉ.सोनाली पाटील, प्रा.गौरी लोणकर, डॉ.मीनल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
जे.एस.एम.मध्ये महिला स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबीर
