विरोधी पक्षाने घेतली कठोर भूमिका
| नेरळ | प्रतिनिधी |
जंगल संपत्ती, स्वच्छ पाण्याचे झरे आणि डोंगर-दऱ्यांनी समृद्ध असलेल्या माथेरान शहरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. राज्य मानवाधिकार आयोगाच्या ताशेऱ्यांनंतर, सरकारने सांडपाणी नियोजनासाठी तब्बल 47 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला. त्यामुळे आता माथेरानमध्ये जागतिक दर्जाचा सांडपाणी वाहून नेणारा आणि त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा एसटीपी प्लांट उभा राहत आहे. परंतु, या प्लांटचे काम गेल्या दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे बोलले जात आहे. तसेच, या कामासाठी आतापर्यंत तब्बल 27 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिल अदा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे या निधी लुटणाऱ्या प्रकल्पाचे काम विरोधी पक्षाने बंद पाडले आहे.
माथेरान शहरात राज्य मानव हक्क आयोगाच्या शिफारशीने एसटीपी प्रकल्प मंजूर झाला आहे. या सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी घरातून किंवा शहरातून निघणारे दूषित पाणी शुद्ध करून ते पुन्हा निसर्गात सुरक्षितपणे सोडण्यासाठी किंवा पुनर्वापरासाठी तयार करणारा हा प्रकल्प आहे.पर्यावरण वाचवण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. गेल्या दोन वर्षांपासून एसटीपी प्लांटचे काम सुरू आहे. परंतु, माथेरानमध्ये सुरू असलेले हे काम अनेक ठिकाणी नियोजनशून्य पद्धतीने आणि संथ गतीने होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, येथील मुख्य रस्ते खोदून ठेवल्यामुळे रस्त्यांची चाळण झाली असून शहर बकाल होत आहे. त्यामुळे रिक्षा आणि घोड्यांच्या अपघातांचाही धोका वाढला आहे. या परिस्थितीला स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. यादरम्यान, विरोधी पक्ष नेते सीताराम कुंभार आणि शिवराष्ट्र पॅनलने स्वतः कामाच्या ठिकाणी भेट देत कामाची पोलखोल केली आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे, या कथित निकृष्ट कामासाठी आतापर्यंत तब्बल 27 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिल अदा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे काम अपूर्ण, गुणवत्ता संशयास्पद आणि कोट्यवधींची देयके? असा प्रश्न सीताराम कुंभार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, यासंदर्भात सीताराम कुंभार यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली असता, त्यांनी ठेकेदाराला जाब विचारला असून खोदकाम तातडीने थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सर्वप्रथम एसटीपीचे साठवण टँक पूर्ण करावेत आणि त्यानंतरच पाइपलाइनचे काम करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकल्पाच्या पाइपलाइन टाकताना योग्य पद्धतीने बांधकाम होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीसीसी न करता पाइप टाकले जात आहेत आणि माती व्यवस्थित दाबली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अनेक घरांना या प्रकल्पातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्या घरांच्या सांडपाण्याची प्रक्रिया कशी केली जाणार? यावर अधिकाऱ्यांकडेही ठोस उत्तर नाही.
– सिताराम कुंभार, विरोधी पक्षनेते, माथेरान नगरपरिषद
