निवडणूक परराज्यात फटका महाराष्ट्रात; कामगार निवडणुकीसाठी गेले गावी
| रायगड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आलेले पश्चिम बंगालमधील कामगार निवडणुकीसाठी गावी गेले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील इतर बांधकामांची गती मंदावली आहे. कामगार नाही तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वेळेत कसा पूर्ण होणार, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित काम मे महिन्यात पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे; मात्र प्रत्यक्षात कामाची गती पाहता हे काम पावसाळा संपेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात महामार्गावरील काही उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम शिल्लक आहे. या कामाचा ठेका घेतलेली एजन्सी ही परराज्यातील आहे आणि कामगारही परराज्यातील आहेत. यातील बहुतांशी कामगार हे पश्चिम बंगालमधील आहेत.
जिल्ह्यात शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात बिल्डरकडून इमारती उभारल्या जात आहेत. या इमारतीच्या सेंट्रिंग, गवंडी काम आणि प्लास्टरच्या कामासाठी पश्चिम बंगालमधील कामगार मोठ्या प्रमाणावर काम करतात. कामाचा दर्जा आणि स्थानिकांपेक्षा कमी पगारात हे कामगार काम करतात त्यामुळे बिल्डर आणि ठेकेदार बंगालमधील कामगारांना प्राधान्य देतात, पश्चिम बंगालमध्ये त्यांची मतदार यादीत नावे आहेत.
सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मतदान केले नाही तर पुढच्या निवडणुकीत मतदार यादीतून नाव वगळले जाईल, मतदान ओळखपत्र रद्द होईल, अशी भीती येथे कामासाठी आलेल्या बंगाली कामगारांमध्ये आहे. त्यामुळे हे कामगार पश्चिम बंगालला गेले आहेत. त्याचा फटका येथील बांधकामांना बसाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वाहनांवर काम करणारे चालक तसेच सेंट्रिंगचे काम करणारे बहुतांशी कामगार हे पश्चिम बंगालमधील आहेत. ते निवडणुकीसाठी गावी गेल्यामुळे महामार्गाच्या कामावर थोडा परिणाम झाला आहे. आठवड्यानंतर कामगार पुन्हा येतील आणि कामाला पुन्हा गती मिळेल, असे ठेकेदार कंपनीचे म्हणणे आहे.
