अफवेमुळे कंपनी परिसरात तणाव
| वावोशी | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील खिरकिंडी येथे असलेल्या एएम/एनएस इंडिया कंपनीत काम करीत असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. संबंधित कामगारास वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप होताच काही काळ कंपनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी तात्काळ कंपनी परिसरात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, कामगाराच्या मृत्यूनंतर कंपनी परिसरासह आजूबाजूच्या गावांत विविध चर्चांना उधाण आले होते. काहींनी संबंधित कामगाराचा मृत्यू महाकाय लोखंडी कॉईल अंगावर पडल्याने झाल्याची माहिती पसरविल्याने कामगार वर्गात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे अनेक कामगार कंपनीच्या गेटवर जमा होत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करू लागले होते. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानुसार संबंधित कामगाराचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी दिली.
