। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या अलिबाग तालुक्यातील राजमळा येथील बंगल्याच्या आवारातील जलतरण तलावात 21 वर्षीय कामगारांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा अपघात की घातपात याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अलिबाग मुरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या बंगल्यासमोर असणार्या जलतरण तलावात यश प्रकाश घारु (वय 21 वर्षे) राहणार-कुरुळ, तालुका -अलिबाग, रायगड हा जलतरण तलाव साफ करण्यासाठी जलतरण तलावात उतरला होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्यामध्ये बुडाला. ही बाब बाजूला काम करीत असणार्या दुसर्या कामगारांच्या लक्षात आली असता त्याने अन्य व्यक्तीच्या मदतीने बाहेर काढून अधिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव करीत आहेत.