गद्दारांना जागा दाखविण्यासाठी कटिबद्ध: राजेंद्र पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेकापच्या मेळाव्यातील अलोट गर्दी बघून विरोधकांना धडकी भरली आहे. पक्षाच्या वाढीसाठी दि. बा. पाटील, दत्तू पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील यांसारख्या असंख्य नेत्यांचे योगदान राहिले आहे. आगामी काळात गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. गद्दारी करणाऱ्यांनी 89 हजार लोकांची माफी मागावी, तरच भाजपमध्ये जावे, अशी संतापजन्य प्रतिक्रीया राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. आगामी निवडणूकीत कार्यकर्त्यांनी कामाला लागून आपली ताकद दाखविणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन मोठ-मोठी आंदोलने झाली पाहिजेत. दि.बा. पाटील यांचे विमानतळाला नाव देण्यासाठी विमानतळावर धडक देणे गरजेचे आहे. गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे पनवेलचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले.

Exit mobile version