लोना कंपनीविरोधात कामगारांचे उपोषण

| आपटा | वार्ताहर |

लाडीवली येथील लोना कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात कंपनीतील कर्मचार्‍यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांविरोधात शनिवार (दि.5) पासून आमरण उपोषणा पुकारले आहे.

दरम्यान, नयन गोळे, सुरेश शिगवण, मनोहर शिर्के, तुषार कालेकर यांनी कंपनी आपल्यावर सातत्याने अन्याय करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाहूरुन येणार्‍या जास्त तर आम्ही ग्रामस्थ असूनही आम्हाला कमी पगार दिला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वांना समान पगार मिळावा, तसेच प्रोबेशन, ट्रेनिंग पिरियड कमी करावा, आदी मागण्यांसाठी उपोषण सुरु केले आहे.

कंपनी व्यवस्थापनाने उपोषणकर्त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की, आम्ही कोणावरही अन्याय केलेला नाही. उपोषणाला बसलेले नयन गोळे व सुरेश शिगवण यांनी कंपनीचे ऑफिसर असलेले प्रभाकर दळवी यांना मारहाण केली आहे व कंपनीत दशहतीचे वातावरण निर्माण केले आहे. जे कंपनीच्या कामाची शिस्त व नियमानुसार वागत नाहीत व कंपनीचे चांगले वातावरण खराब करतील त्यांच्यावर कंपनीच्या नियमानुसार शिक्षाही होणार, असे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version