‘सिंगल युज प्लॅस्टिक’ बंदीवर कार्यशाळा

पनवेल महापालिकेचा स्तुत्य उपक्रम
| पनवेल | वार्ताहर |

केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिनियमानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये ‘सिंगल युज प्लॅस्टिकवरती’ संपूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. या प्लॅस्टिकंबदीची सविस्तर माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापारी व नागरिकांना व्हावी यासाठी पनवेल महापालिकेच्यावतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानुसार आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘सिंगल युज प्लॅस्टिक’ बंदीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपायुक्त सचिन पवार, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे रायगड जिल्ह्याचे प्रादेशिक अधिकारी व्ही.व्ही. किल्लेदार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, क्षेत्रीय अधिकारी ए.एस लोहिया, योगेश देशमुख, मीना पवार, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड, सर्व स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता विभागातील अधिकारी, पनवेल, कळंबोली, कामोठे येथील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, हॉटेल असोसिएशन, प्लॅस्टिक विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी उद्यापासून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘सिंगल युज प्लॅस्टिक’ बंदीवरती कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून व्यापारी वर्गासाठी प्रबोधनपर मार्गदर्शक माहितीपट दाखविण्यात आला. तसेच ‘सिंगल युज प्लॅस्टिक’ बंदी कायद्याविषयी माहिती सांगण्यात आली. सिंगल युज प्लॅस्टिकमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो, हे सांगण्यात आले. तसेच व्यापार्‍यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.

महापालिकेच्या वतीने ‘सिंगल युज प्लॅस्टिक’ बंदीवरती कडक कारवाई करण्यात येणार आहे. सिंगल युज प्लॅस्टिक मध्ये कोणकोणत्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे, कोणकोणत्या वस्तूंना परवानगी देण्यात आली आहे, याविषयावर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या तळ मजल्यावर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचा लाभ विद्यार्थी, नागरिक, व्यापारीवर्गाने घ्यावा.

– आयुक्त गणेश देशमुख


Exit mobile version