विश्वविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्तानने चारली धुळ

अफगाणी फिरकीची दमदार कामगिरी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

विश्वविजेत्या इंग्लंडने स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी दमदार कामगिरी अफगाणिस्ताने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर केली. 285 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडला 210 धावांमध्ये गुंडाळत 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तब्बल 15 व्या सामन्यात अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानची फिरकी त्रिमूर्ती असलेल्या मुजीबूर रहमान (3), रशीद खान (3) आणि मोहम्मद नबी (2) यांनी आठ विकेट घेत इंग्लंडला पार नेस्तनाबूत झाला. फारुकी आणि नावीन हकने प्रत्येकी एक विकेट घेतल्या.

पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतना 284 धावा कुटल्या. इंग्लंडने या सामन्यामध्ये तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला, तरीही अफगाणिस्तानला रोखण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आलं नाही. अफगाणिस्तानचा डाव शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर संपला. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

इंग्लंडच्या डावाची सुरुवात जॉनी बेअरस्टाॅ आणि डेव्हिड मालन यांनी केली. मात्र बेअरस्टाॅ अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये बाद झाला. त्याला फारुकीने बाद करत अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला जो रूट सुद्धा स्वस्तात परतला. त्याला सातव्या षटकामध्ये मुजीफने क्लीन बोल्ड करत अफगाणिस्तान संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था दोन बाद 33 अशी झाली. डेव्हिड मालन एका बाजूने किल्ला लढवत असतानाच 13 व्या षटकांत नबीने बाद करत आणखी एक यश अफगाणिस्तानला मिळवून दिले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 3 बाद 68 अशी झाली. त्यानंतर इंग्लंडचा डाव सावरलाच नाही. दरम्यान, अफगाणिस्तानने मागील सामन्यात भारताविरुद्ध 273 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र गोलंदाजीमध्ये त्यांची हवा निघाली होती. आज मात्र फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही अफगाणिस्तानच्या संघाकडून चमकदार कामगिरी झाली.

Exit mobile version