अलिबागमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक भवनात शुक्रवारी अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

ज्येष्ठांना उपक्रमशील ठेवणारी व भक्कम आधार देणारी अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. या संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या कार्याचा गौरव म्हणून माजी अध्यक्ष डी.डी. नाईक यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यकारिणी सदस्य व उद्योजक गजेंद्र दळी यांच्या हस्ते माजी अध्यक्ष डी.डी. नाईक यांचाही पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यकारणी सदस्य बळवंत वालेकर यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या संस्थेतील कार्याचा आढावा घेतला. या संस्थेत त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा देऊन अलिबाग तालुक्यात ग्रामीण पातळीवर अठरा नवीन ज्येष्ठ नागरिक संस्था स्थापन केल्या असल्याची व त्याना सातत्याने मार्गदर्शन करीत असल्याची माहिती दिली.

यावेळी संस्थेच्या महिला कार्यकारिणी सदस्या चारुशीला शरद कोरडे यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करून त्यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन मेघना कुलकर्णी व शुभदा ठोसर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या समारंभास उपाध्यक्ष प्रफुल्ल राऊत, सचिव यशवंत थळे, आर.के. घरत, पुरुषोत्तम साठे, दिलीप शिंदे, ज्योती पाटील, विलास डोळस, शरद कोरडे, रोहिणी शेठ आदी सभासद उपस्थित होते.

Exit mobile version