अनुभव रंगमंचाचा, रंगकर्मींचा कार्यक्रमाचे आयोजन
। पनवेल । वार्ताहर ।
जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सहकार्याने पनवेलमधील रिफ्लेक्शन थिएटर या तरूणांसाठी नाट्य क्षेत्रात काम करणार्या संस्थेच्या माध्यमातून अनुभव रंगमंचाचा, रंगकर्मींचा या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी सर्व उपस्थित कलाकार आणि कलारसिकांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नाट्यकर्मी लेखक-दिग्दर्शक समीक्षक अनिल गवस, हिंदी आणि मराठी मालिका आणि चित्रपट लेखक अंबर हडप, मराठी अभिनेते प्रसाद दाणी, मंगेश अपराज उपस्थित होते.
अनिल गवस यांनी नवोदिताना मार्गदर्शन करताना सांगितले की, रंगमंचावर येऊन उभ राहून दोन शब्द बोलण हा आत्मविश्वास जो पुढे जीवनभर पुरतो, यासाठी ही जी रंगभूमी आहे ही रंगभूमी खूप महत्वाची आहे. त्यामुळे आपला हा रंगमंच सतत व्यक्तिमत्व विकास घडवत असतो त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे हे खूप गरजेचे आहे असे ते म्हणाले.
यावेळी लेखक-दिग्दर्शक सिद्धार्थ साळवी, गायक जितेंद्र तुपे, ध्वनी संयोजक राहुल गंद्रे, संगीतकार निशांत ओहळ, अक्षर गणेश चित्रकार नवनाथ दळवी, पीआरपी ,महाराष्ट्र प्रदेश सचिव नरेंद्र गायकवाड, पखवाज वादक गणेश पाटील, अभिनेता ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट भास्कर वाकडीकर, अभिनेता निर्माता धीरज शिंदे, छायाचित्रकार कपिल आडोळे यांनी या कार्यक्रमाला भेट दिली.