| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
दररोज हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणारी, सर्वसामान्यांपासून ते नोकरदार आणि उच्चपदस्थांपर्यंत सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली उपनगरी रेल्वे अनेकांसाठी केवळ प्रवासाचे साधन नाही, तर ती त्यांच्या जगण्याचा एक महत्त्वाचा साथीदार आहे. याच रेल्वेशी जुळलेले भावनिक नाते दसऱ्याच्या निमित्ताने पनवेल रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. रोजच्या धावपळीत एकत्र प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी आपल्या रेल्वेगाडीची मनोभावे पूजा करून दसरा सण साजरा केला. या अनोख्या परंपरेने रेल्वे प्रवासातील माणुसकीचे आणि जिव्हाळ्याचे दर्शन घडवले. दसऱ्याच्या निमित्ताने नेहमीच्या वेळेत पनवेल स्थानकात येणाऱ्या रेल्वेगाडीचे प्रवाशांनी उत्साहात स्वागत केले. गाडीला मोठमोठे फुलांचे हार घालून, रंगीबेरंगी कागदी तोरणांनी डबा सजवून आणि खिडक्यांना फुलांच्या माळा लावून रेल्वेगाडीला सणाचा साज चढवण्यात आला. त्यानंतर रेल्वेची पूजा करून नारळ फोडण्यात आला. ‘अंबे मात की जय’, ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा जयघोषांनी स्थानकातील वातावरण भक्तीमय झाले होते.
पनवेल स्थानकात रेल्वेची पूजा
