। खारेपाट । वार्ताहर ।
टाकादेवी स्पोर्ट क्लब आणि ग्रामस्थांच्यावतीने नारळी पौर्णिमेनिमित्त मांडवा येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापुरच्या माऊली जगदाडे याने विजेतेपद पटकाविले.
अंतिम आव्हानाची कुस्ती हरियाणा विरुध्द कोल्हापूर यांच्यात रंगली होती. त्यामध्ये कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय कुस्ती पेहलवान माऊली जगदाडे याने हरियाणाच्या पठ्ठयाला चितपट केले. आई फांऊडेशन चोंढीचे अध्यक्ष राजू साळुंके व जि.प माजी सभापती दिलीप भोईर यांच्या हस्ते त्याला 1 लाख रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रथम आलेल्या चौधरीपाडा भिंवडी ठाणे आखाडयाला 23 गुण मिळाले, तर द्वितीय क्रमांक शिवाजी व्यायाम शाळा आंदोशी अलिबाग 17 गुण तसेच तृतीय क्रमांक जय हनुमान तालिम संघ वाडगांव यांना 17 गुण मिळाले. स्पर्धेत लहान गट व मोठ्या गटातील दोनशेहून अधिक कुस्त्या खेळविण्यात आल्या.
यावेळी अमित नाईक, सागर पवार, जयेंद्र भगत, प्रमोद भगत, राजाभाऊ ठाकूर, सुरेंद्र म्हात्रे, प्रमोद दळवी, सुधीर म्हात्रे, अनिल पाटील, सचिन म्हात्रे, अलिबाग तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सुमारे 50 हजार प्रेक्षकांची मोठी गर्दी सामनेे पाहण्यासाठी होती. भर पावसात भव्य कुस्त्या संपन्न झाल्या.
स्पर्धेत रायगड, ठाणे, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, महाराष्ट्रसह हरियाणा, दिल्ली येथील कुस्ती खेळाडुंचा समावेश होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी केशव पाटील, अशोक घरत, गजानन पाटील, सुनिल म्हात्रे, ऋषिकांत भगत,अंकूर घरत, कुलदिप पाटील, सौरभ पाटील व मंडळातील सर्वांनी मेहनत घेतली. सर्व मान्यवरांना टाकादेवी मांडवा तर्फे सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.