। मेलबर्न । वृत्तसंस्था ।
बॉक्सिंग डे कसोटीत भारताची प्लेइंग इलेव्हनची निवड पुन्हा चुकली असून जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर गोलंदाजीचा सर्व भार पडला होता. आणि म्हणूनच ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा उभ्या केल्या आहेत. फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारताकडूनही तसेच प्रत्युत्तर अपेक्षित होते. परंतु, रोहित शर्माने अपयशाचा पाढा गिरवला. मात्र, 22 वर्षीय यशस्वी जैस्वालने ऑसी मार्यासमोर उभा राहिला आणि त्याने अर्धशतक झळकावताना अनेक दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासने (65) पदार्पणातच भारतीय गोलंदाजांना दमवले. त्याला पाहून उस्मान ख्वाजाही (57) पेटला आणि त्यानेही अर्धशतक झळकावले. यानंतर मार्नस लाबुशेन (72) व स्टीव्ह स्मिथ (140) यांनी देखील दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचे तळाचे फलंदाज अॅलेक्स केरी (31), कर्णधार पॅट कमिन्स (49) हे देखील चांगले खेळले आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 धावांवर गुंडाळण्यात आला. यावेळी, जसप्रीत बुमराहने 4, रवींद्र जडेजाने 3 व आकाश दीपने 2 बळी घेतले.
प्रत्युत्तरात आलेल्या भारताला दुसर्याच षटकात धक्का बसला. दोन सामन्यानंतर पुन्हा सलामीला आलेला रोहित शर्मा (3) स्वस्त्यात माघारी परतला. यानंतर लोकेश राहुलचा (24) त्रिफळा उडवला. यशस्वी जैस्वाल व विराट कोहली मैदानावर उभे राहिले आणि दोघांनी तिसर्या बळीसाठी शतकी भागीदारी केली. दरम्यान, यशस्वीने अर्धशतक पूर्ण करताना अनेक दिग्गजांशी बरोबरी केली आहे. तो 117 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकारांसह 82 धावांवर बाद झाला. तो दुर्दैवीरित्या धावचित झाला. पाठोपाठ विराटही 36 धावांवर बाद झाल्याने भारतीय संघ सध्या 5 बाद 164 अशा अवस्थेत आहे. कसोटीचे तीन दिवस अजून बाकी आहेत आणि फॉलो ऑन टाळण्यासाठी भारतीय संघाला अजून 110 धावांची गरज आहे. आता मैदानात असलेली जोडी आणि त्यानंतर नितिश रेड्डी तसेच, वॉशिंग्टन सुंदर हे दोन फलंदाज अजून खेळायचे बाकी आहेत.







