रायगड जिल्ह्यातील यात्रोत्सव रद्द

कोट्यवधीची उलाढाल थांबणार
भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले
। अलिबाग । भारत रांजणकर ।
वैकुंठ चतुर्दशी नंतर रायगड जिल्ह्यात यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे गेल्यावर्षी जिल्ह्यात एकही यात्रा भरविण्यात आली नव्हती तसेच दर्शनासाठी मंदिर देखील बंद असल्याने भाविकांना दर्शन देखील घेता आले नव्हते. या वर्षी देखील संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यातील यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून त्याप्रमाणे संबंधीत देवस्थान तसेच स्थानिक प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र या दरम्यान भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. कोटयवधींची आर्थिक उलाढाल होत असते. मात्र यात्रोत्सवच होणार नसल्याने ही उलाढाल थांबणार असून त्याचा फटका अनेक छोटा मोठया व्यवसायीकांना बसणार आहे.
रायगड जिल्ह्यात यात्रोत्सवांचा फार मोठा इतिहास आहे. वैकुंठ चतुर्दशीपासून अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्‍वरच्या यात्रेपासून या यात्रोस्तवाला प्रारंभ होतो. त्यानंतर कनकेश्‍वर येथील यात्रा झाल्यानंतर एकादशीला खोपोली तालुक्यातील साजगाव येथील बोंबल्या विठोबाची कार्तिक कृष्ण एकादशीला यात्रा भरते. संत तुकाराम महाराज यांचा इतिहास लाभलेली ही यात्रा सलग 15 दिवस भरते. या यात्रेत मोठया प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने त्याची उलाढाल लाखोंवर जाते. राज्यभरातून या यात्रेला गेल्या वर्षीनंतर यावेळी देखील परवानगी मिळणार नसल्याने भाविकांचा हिरेमोड झाला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील व्यवसायीक या यात्रेत आपला व्यवसाय थाटत असतात. त्यांनाही याचा फार मोठा फटका बसणार आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे धंदा मंदावला असल्याने या मोसमात यात्रोत्सवावर मोठा भरवसा ठेवण्यात आला होता. कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होत असल्याने सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र तीच यात्रा भरणार नसल्याने सर्वच व्यवसायीक हवालदिल झाले आहेत. तर फक्त दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी दर्शन मिळणार असल्याने समाधान व्यक्त करतानाच घरी जाताना खाऊ किंवा चिजवस्तू नेता येणार नसल्याने नाराजी देखील व्यक्त केली आहे.
अलिबाग तालुक्यात नागेश्‍वर आवास, कनकेश्‍वर, वरसोली विठोबा, चौल भोवाळे येथील दत्तगुरु त्याचप्रमाणे रोहा तालुक्यातील महादेववाडी येथील महादेवाची, मुरुड तालुक्यातील दत्तात्रेय अशा अनेक यात्रा या काळात भरविण्यात येत असतात. मात्र कोविड व डेल्टा प्लस रोगांच्या महामारीमुळे यात्रा रद्घ करण्यात आली आहे. मात्र भविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे.

आवास येथे भरणारी श्री. नागेश्‍चर यात्रा या वर्षी कोव्हिड – 19 आणि डेल्टा प्लस या रोगाच्या महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे, याची सर्व भविकांनी तसेच सर्व दुकानदारांनी नोंद घ्यावी. सर्व भविकांना श्री. नागेश्‍चराच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी श्री. नागेश्‍चर मंदिर आवास खुले ठेवण्यात येणार आहे. सदर निर्णय ग्रुप ग्रामपंचायत आवास आणि ग्रामस्थ आवास यांनी घेतला आहे. सर्व भाविकांनी शासनाचे नियम पाळून दर्शनाला येताना तोंडावर मास्क लावणे गरजेचे आहे. यात्रा रद्द झाल्याने कोणत्याही दुकानदाराने आपली दुकाने यावर्षी आणू नयेत.
ग्रामपंचायत आवास

Exit mobile version