रायगडात मान्सून सक्रीय, शेतकरी सुखावला
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लवकर एंट्री मारूनही पुढचे काही दिवस ओढ देणारा मान्सून अखेर रायगडात सक्रीय झाला आहे. शनिवारी रात्री ढगांनी गर्दी केल्यानंतर पावसाने रविवारी पहाटे अलिबागसह जिह्यात जोरदार हजेरी लावली. रायगड जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पावसाने दुपारी काहीवेळ विश्रांती घेत पुन्हा संततधार सुरू ठेवली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने रायगडकर सुखावले आहेत. पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून 22 ते 24 जून दरम्यान रायगड जिल्ह्यासह ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मागील आठवडाभर पावसाने दडी मारली. त्यामुळे रायगडकर उकाडयाने हैराण झाले होते. अखेर विकेण्डच्या मुहूर्तावर मान्सून सक्रीय झाला आणि रायगडकरांना उकाडयापासून मोठा दिलासा मिळाला. जवळपास पाऊण तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पावसाने दुपारी काही वेळ विश्रांती घेतली. नंतर सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. पावसाने आठवडाभर दडी मारल्यामुळे शेजारच्या ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत होते. आता मान्सून सक्रिय झाल्यामुळे त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याच्या सतर्कतेच्या सूचना
रायगड जिल्हा तसेच मुंबई, ठाण्यासह उर्वरित राज्यात पुढील 4 दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. काही ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, मुंबई व परिसरात 22 जूनपर्यंत सुमारे 150 ते 200 मिमि. पावसाची नोंद होऊ शकते. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अतिवृष्टी होऊ शकते, असे भाकीत करून हवामान खात्याने स्थानिक प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 27.68 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 442.80 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे अलिबाग- 65.00 मि.मी., पेण-19.00 मि.मी., मुरुड- 36.00 मि.मी., पनवेल- 23.40 मि.मी., उरण-24.00 मि.मी., कर्जत- 29.40 मि.मी., खालापूर- 36.00 मि.मी., माणगाव- 3.00 मि.मी., रोहा- 22.00 मि.मी., सुधागड-17.00 मि.मी., तळा- 3.00 मि.मी., महाड- 22.00 मि.मी., पोलादपूर- 19.00 मि.मी, म्हसळा- 12.00 मि.मी., श्रीवर्धन- 60.00 मि.मी., माथेरान- 52.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 442.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 27.68 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 3.55 टक्के इतकी आहे.