ऑनलाईन पासला क्यूआर कोडची सुविधा
| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) प्रवाशांना अद्ययावत सुविधांसह विविध सवलती उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रवास अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महामंडळाने आवडेल तेथे प्रवास ही योजनाही आता ऑनलाईन केली आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या चार किंवा सात दिवसांचा पास काढता येणार असून, पास काढण्यासाठी आगारात जाण्याची किंवा तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
आवडेल तेथे प्रवास योजनेंतर्गत चार आणि सात दिवसांचे पास दिले जातात. या पासच्या माध्यमातून राज्यात इच्छित ठिकाणी प्रवास करता येतो. यापूर्वी हे पास आगारातून हस्तलिखित पद्धतीने वितरित केले जात होते. त्यामुळे पास काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहावे लागत होते. आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ, श्रम आणि पैशांची बचत होणार आहे. प्रवाशांना महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरून ऑनलाईन पास काढता येणार आहे. या प्रणालीद्वारे चार आणि सात दिवसांचे आवडेल तिथे प्रवास पास उपलब्ध आहेत. ऑनलाईन काढलेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमधील पीडीएफ स्वरूपात प्रवासासाठी वैध मानला जाणार आहे. प्रवासादरम्यान वाहक ईटीआय मशिनद्वारे पासवरील क्यूआर कोड स्कॅन करून त्याची पडताळणी करणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी ऑनलाईन पाससोबत वैध ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे.
