विदेशी तरुणांना भात लावणीची भुरळ

ग्रामीण संस्कृतीचा अभ्यासाठी उद्धर येथे दाखल

| पाली /बेणसे | प्रतिनिधी |

कृषी पर्यटन आणि शाश्वत शेतीची थेट युरोपमधील तरुणाईला भुरळ घातली आहे. सुधागड तालुक्यातील उद्धर येथे जर्मनीहून आलेला लेक्स आणि पोर्तुगालची लिली हे दोन तरुण पर्यटक चक्क भाताच्या खाचरात उतरून लावणीचा आनंद घेत आहेत. त्यांच्या या अनोख्या शेतीप्रेमाची आणि भारतीय संस्कृतीशी समरस होण्याची चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.

जागतिक स्तरावरील शाश्वत आणि नैसर्गिक शेती बाबत जनजागृती वाढत असताना, हे परदेशी तरुण भारताच्या पारंपरिक शेती पद्धतीचा अनुभव घेण्यासाठी आले आहेत. उद्धर येथील आत्मतृप्ती र्माकल्चरचे संचालक तुषार केळकर यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून ते येथे पर्यटन व अभ्यास दौऱ्यावर आले आहेत. प्रत्यक्ष मातीत काम करण्याचा व ग्रामीण भागात राहण्याचा अनुभव त्यांना घ्यायचा होता. लेक्स आणि लिली चिखलात उभे राहून भाताची रोपे लावली. त्यांच्या या सहभागामुळे स्थानिक शेतकरीही भारावून गेले आहेत.

भातलावणीच्या अनुभवाविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, हे काम आव्हानात्मक असले तरी निसर्गाच्या इतके जवळ जाणे आणि अन्नाच्या निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवणे हा एक अद्भुत प्रकार आहे. केवळ शेतीच नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे आणि खाद्यपदार्थांचेही हे परदेशी पाहुणे चाहते झाले आहेत. ग्रामीण पद्धतीचे जेवण आणि आदरातिथ्याने त्यांना भुरळ घातली आहे.

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार कसा होऊ शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. या परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे स्थानिक तरुणांनाही शेतीकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला आहे. सात दिवस हे दोघे फार्मवर राहून र्माकल्चरच्या इतर विविध संकल्पना आणि ग्रामस्थांसोबत वेळ घालवून भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास करणार आहेत, असे तुषार केळकर यांनी सांगितले.

Exit mobile version