। रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी रेल्वे स्टेशनजवळ पनवेल बाजूकडे जाणार्या ट्रॅकवर तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात योगेशचे शिर धडावेगळे झाले. सध्या परिसरात त्याने आत्महत्या का केली असावी, याबाबत चर्चा सुरु असून रसायनी पोलीस तपास करीत आहेत.
याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वावेघर येथील योगेश शिवा चव्हाण (वय 25) याने कोणत्यातरी अज्ञात कारणाने रसायनी रेल्वे स्टेशन येथील पनवेल बाजूकडे जाणार्या ट्रॅकवर झोपून आत्महत्या केली. ही बाब शंकर भिमा चव्हाण (वय 46) यांच्या 25 फेब्रुवारी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निदर्शनास येताच त्यांनी रसायनी पोलिसांना रसायनी रेल्वे स्टेशनजवळ आत्महत्या केल्याची माहिती दिली.
रसायनी रेल्वे स्टेशनजवळ पनवेल बाजूकडे जाणार्या ट्रॅकवर किमी 79/7 ते 79/6 मध्ये योगेशचा मृतदेह आढळून आला आहे. या अपघातात शिर धडावेगळे झाले असून रसायनी पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली. योगेशचा मृतदेहावर चौक येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे, तपासिक अंमलदार के.पी.पाटील अधिक तपास करीत आहेत.