आईस्क्रीम फ्रँचायझीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

| पनवेल | प्रतिनिधी |

नॅचरल आईस्क्रीमची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आमिष दाखवून उलवे येथील 24 वर्षीय बेरोजगार तरुणाची 6 लाख 24 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात नीरज पाटील हा उलवे सेक्टर 23 येथे राहतो. नोकरीच्या शोधात असताना त्याला इन्स्टाग्राम आणि मोबाईलच्या माध्यमातून नॅचरल आईस्क्रीमची फ्रँचायझी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी कंपनीच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून नीरजशी संपर्क साधला. व्यवसायातून चांगला नफा मिळेल असे सांगून त्याचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून नीरजकडून ऑनलाईन पद्धतीने 6 लाख 24 हजार रुपये हस्तांतरित करून घेतले. पैसे भरल्यानंतर नीरजने नॅचरल आईस्क्रीमच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून खातरजमा केली. त्यावेळी गेल्या दोन वर्षांपासून कंपनीकडून अशा प्रकारची कोणतीही फ्रँचायझी दिली जात नसल्याची माहिती त्याला मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नीरजने आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी टाळाटाळ करू लागले. अखेर नीरजने उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Exit mobile version