। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ परिसरातील उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या 17 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रचित देशमुख रा. सवणे, ता. खालापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रचित नुकताच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. सुट्टीच्या निमित्ताने तो नेरळ येथे आपल्या मावशीकडे आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 17) दुपारी सुमारे साडे बारा वाजण्याच्या सुमारास नेरळ येथील हेटकर आळी परिसरात राहणाऱ्या आपल्या मावशी व काका रामदास शिंदे यांच्या घरी आलेला प्रचित हा मावशी, काका तसेच शेजारील कुटुंबीयांसोबत नेरळ-कळंब राज्य मार्गावरील दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बिरदोले परिसरातील बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीवर कपडे धुण्यासाठी गेला होता.
दरम्यान, काहीजण नदीकाठी कपडे धुत असताना प्रचित हा पोहण्यासाठी नदीत उतरला. मात्र, नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याने आपल्याला वाचवण्यासाठी हाक देखील दिली. यावेळी मावशीने स्वतः तसेच शेजारील अरुण गावंडा यांनी तरुणाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली होती. मात्र, काही सेकंदांतच प्रचित पाण्यात दिसेनासा झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर प्रचित याला नदीबाहेर काढण्यात आले.
यानंतर तुंगेकर यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तर सदर मृत तरूणाचा मृतदेह हा शवविच्छेदनानंतर त्यांचे कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तर नेरळ पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उल्हास नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
