कोकण रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावात कोकण रेल्वेच्या धडकेने अनोळखी अंदाजे 16 ते 18 वयोगटातील तरुणाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. सदरील घटना गुरुवारी (दि.16) रात्री 11:45 वाजण्याच्या सुमारास माणगाव रेल्वे स्टेशनवर घडली. सदर घटनेची खबर नरेश गायकवाड (वय-37) रा.वरसगाव ता.रोहा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दादर त्रिवली रेल्वे एक्स्प्रेस गाडी क्र.06071 ही माणगाव बाजूकडून महाड बाजूकडे जात असताना एक अनोळखी 16 ते 18 वयोगटातील तरुण रेल्वे ट्रॅकवर आल्याने त्याला कोकण रेल्वेची धडक लागून यामध्ये त्याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याचे वर्णन वय अंदाजे 16 ते 18 वर्ष, अंगात काळ्या रंगाचा टीशर्ट, काळ्या रंगाचा ट्रॅक पॅन्ट, पायात चप्पल, गळ्यात काळा दोरा त्यात ताईत असे आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि नं.33/2021 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वराळे हे करीत आहेत. दरम्यान या तरुणाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास माणगाव पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.(02140-263005), तपासिक अंमलदार सपोनि वराळे 8378981738 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन माणगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version