| रसायनी | प्रतिनिधी |
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, असे आमिष दाखवून रसायनीतील रीस येथील एका व्यक्तीची तब्बल 38 लाख 31 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात सायबर भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेले जितेंद्र कुमार श्रीवास्तव हे रसायनीजवळील रिस गावचे रहिवासी आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी काव्य जैन नावाच्या एका अनोळखी महिलेचा व्हॉट्सॲपवर कॉल आला होता. तिने श्रीवास्तव यांना क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करण्याचा सल्ला दिला. तसेच, त्यातून मोठा नफा मिळवून देण्यासाठी शशिकांत नावाच्या कथित ट्रेडिंग एक्सपर्टचा मोबाईल नंबर त्यांच्यासोबत शेअर केला. त्यानंतर श्रीवास्तव यांनी शशिकांत यांच्याशी संपर्क साधला असता, त्याने त्यांना एक लिंक पाठवून मोबाईलवर ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून श्रीवास्तव यांनी सुरुवातीला 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली. या पहिल्या गुंतवणुकीवर त्यांना लगेच नफा मिळाला. त्यानंतर, सतत ट्रेडिंग केल्यास असाच मोठा नफा मिळेल, मात्र नफ्यातील 30 टक्के रक्कम आम्हाला द्यावी लागेल, अशी अट भामट्यांनी घातली. सुरुवातीला मिळालेल्या नफ्यामुळे विश्वास बसल्याने श्रीवास्तव यांनी भामट्यांच्या सांगण्यावरून टप्प्याटप्प्याने तब्बल 38 लाख 31 हजार रुपये गुंतवले. काही दिवसांनंतर त्यांच्या ॲपवरील खात्यात तब्बल 1 कोटी 18 लाख रुपयांचा नफा झाल्याचे त्यांना दिसले. मात्र, जेव्हा श्रीवास्तव यांनी ही नफ्याची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती जमा झाली नाही. याबाबत त्यांनी पुन्हा शशिकांतशी संपर्क साधला असता, त्याने रक्कम काढण्यासाठी आधी 40 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागेल, अशी नवी मागणी केली. अगोदरच मोठी रक्कम गुंतवली असताना पुन्हा लाखो रुपये मागितल्याने आपली फसवणूक झाल्याचे श्रीवास्तव यांच्या लक्षात आले. त्यांनी डिपॉझिट भरण्यास नकार देत थेट तळोजा पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत.
तरुणाला तीस लाखांचा गंडा

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809