लग्न जुळवताना मुलांच्या वडिलांची दमछाक; दोन महिने उरले तरी शोध सुरूच
| कोलाड | प्रतिनिधी |
“तुम्ही फक्त मुलगी द्या, लग्नाचा सगळा खर्च आम्ही करतो!” अशी विनंती करूनही मुलांसाठी वधू मिळत नसल्याचे चित्र सध्या रायगड जिल्ह्यात दिसून येत आहे. यंदाच्या वर्षातील मुहूर्तांपैकी विवाहासाठी केवळ दोन महिने उरले असतानाही मुलांचे वडील अजूनही मुलींच्या शोधात फिरत असल्याने त्यांची मोठी दमछाक होत आहे.
विवाह इच्छुक वरांच्या पालकांना सध्या वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, त्या शहरात स्थायिक असलेल्या मुलांनाच प्राधान्य देत आहेत. “मुलगा मुंबईत राहतो का?, स्वतःचा फ्लॅट आहे का?, चांगली नोकरी आणि गाडी आहे का?” असे प्रश्न विचारल्यानंतरच पुढील बोलणी होत असल्याचे चित्र आहे. या अपेक्षांमध्ये बसत नसल्यास प्रस्ताव लगेच नाकारला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक तरुण शेती, भाजीपाला उत्पादन किंवा इतर पारंपरिक व्यवसायात गुंतलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही केवळ शहरात वास्तव्य नसल्यामुळे त्यांना विवाहासाठी नकार मिळत असल्याचे समोर येत आहे.
परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, काही पालक आपल्या मुलांना काही काळासाठी शहरात खोली भाड्याने घेऊन राहण्यास पाठवत आहेत, जेणेकरून “शहरात राहतो” असे सांगून लग्न जुळवता येईल. वधूपक्षाकडून शहरात स्वतःचे घर किंवा स्थैर्य असलेल्या मुलालाच पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, शिक्षणाचा वाढलेला स्तर, शहरांचे आकर्षण आणि ग्रामीण भागातील सुविधांचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, गावी राहणाऱ्या आणि शेती व्यवसाय करणाऱ्या तरुणांना विवाहासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून ही समस्या अधिक तीव्र झाली असून, एकेकाळी मुलींचे लग्न जुळवण्यासाठी वडिलांना धावपळ करावी लागत होती; मात्र आता चित्र उलटे झाले आहे. अनेक तरुणांचे वय 30 वर्षांपलीकडे गेले असून, तरीही त्यांचे लग्न जमत नसल्याची खंत पालक व्यक्त करत आहेत.
