| दिघी | वार्ताहर |
आजचं युग स्पर्धेचे युग आहे. आपण सर्वांनी योग्य नियोजन, वेळेचा सदुपयोग आणि अचूक मार्गदर्शन या त्रिसूत्रीचा वापर करून आपण आयुष्यातील प्रत्येक आव्हानावर मात करू शकतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि चिकाटी याची नितांत आवश्यकता असते. रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गरुडझेप उपक्रम रायगड जिल्ह्यात राबवला जात आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. पोलीस भरतीसाठी आपण सर्वांनी सज्ज असले पाहिजे. रायगड प्रशासन आपणा सर्वांच्या समवेत आहे, असे प्रतिपादन अमित शेडगे प्रांताधिकारी श्रीवर्धन यांनी केले आहे.
श्रीवर्धन प्रांत कार्यालयाच्या सभागृहात गरुडझेप रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या माध्यमातून श्रीवर्धन तालुक्यातील तरुणांसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी उपस्थित तरुणाईला मार्गदर्शन केले. याप्रसंगी तहसीलदार श्रीवर्धन सचिन गोसावी, परिविक्षाधीन तहसीलदार विनायक घुमरे, श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी कविता देवर्डेकर, माजी सैनिक व सध्या श्रीवर्धन येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले बाळकृष्ण भामरे यांनी पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करणे तसेच शारीरिक चाचणी व लेखी चाचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले विविध दाखले उमेदवारांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. तसेच पोलीस भरतीविषयक पुस्तके उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांनी परीक्षेच्या अभ्यासासाठी गरुडझेप अॅपचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. या शिबिराला पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.