ऐनवहाळ गावावर शोककळा
। नागोठणे । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव गावच्या हद्दीत असलेल्या नम्रता धाब्यासमोर एसटी बसने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत स्कुटीचालक तरुणी गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. स्कुटीवर मागे बसलेला या तरुणीचा भाऊ जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.1) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला. देवयानी किशोर गोळे (वय 19, रा. ऐनवहाळ, ता.रोहा) असे मृत तरुणीचे नाव असून सुजल किशोर गोळे (15) असे जखमी मुलाचे नाव आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात तरुणीचा मृत्यू झाल्याने ऐनवहाळ गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामधील मृत तरुणी तिचा प्रथमच गौरीचा ओवसा असल्याने आपल्या मामाकडे देवकान्हे येथे ओवसा देण्यासाठी आपल्या ऐनवहाळ गावातून मुंबई-गोवा महामार्गावरून चालली होती. त्याचवेळी खेड डेपोच्या व खेडवरून मुंबईकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या भरधाव एसटी बसने स्कुटीला मागून जोरदार धडक दिली. यात स्कुटीचालक तरुणी देवयानी हिच्या डोक्याला व शरीराला गंभीर जखमा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर स्कुटीवर मागे बसलेला तरुणीचा भाऊ सुजल जखमी झाला. या अपघातानंतर मृत तरुणीचे पार्थिव नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. यावेळी ऐनवहाळ गावातील तरुण व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या अपघातामधील एसटी बसचालक जितेंद्र अवसरमल याला ताब्यात घेण्यात आले आहे. या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याप्रकरणी कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. आबा गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.
