। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे शहरातील हडपसर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने हडपसर भागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी तनुज माकीन (रा. जबलपूर, मध्य प्रदेश) याच्या विरोधात हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तनुज या दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. पीडित तरुणी आणि आरोपी तनुजची सुरुवातीला मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याच दरम्यान आरोपी तनुजने पीडित तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. घटनेतील पीडित तरुणीने काही दिवसांनी आरोपी तनुजकडे लग्न करण्याबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, माझा नाद सोड नाही तर तुझ्यासह कुटुंबातील सर्वाना जिवे मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर अखेर पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत हडपसर पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली असून तनुज माकीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.