| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे शहरात एका 36 वर्षीय महिलेवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर आरोपी तरुणांनी अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या पीडित विवाहितेचा २५ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. त्या निमित्त दोन तरुण आणि पीडित महिला केक कापण्यासाठी एका कारमध्ये बसले. वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये दोन आरोपींनी गुंगीचं औषध टाकलं. तोच केक त्या महिलेला भरवला, त्यामुळे महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर दोन आरोपींनी कार ठाणे न्यायालयाच्या पार्किंग मध्ये पार्क केली. या पार्किंगमध्येच दोन तरुणांनी महिलेवर अत्याचार केले. आणि त्याचे व्हिडिओ देखील चित्रित करण्यात आले. महिलेला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती नको त्या अवस्थेत होती. मात्र, या दोघांनी तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन् तिचे तोंड बंद करण्याचे प्रयत्न केले. मात्र डगमगून न जाता महिलेने तडक पोलीस ठाणे गाठले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी एकाला राहत्या घरातून अटक केली असून, दुसरा फरार आहे. तर, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.







