Panvel Crime: तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी जेरबंद

। पनवेल। प्रतिनिधी।

पनवेल शहरातील तक्का सिग्नलजवळील शिवम आर्ट्स दुकानात काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणावर मध्यरात्री धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. या कारवाईत हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयताही जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील शाकिब समीर खान (24) हे तक्का सिग्नल परिसरातील शिवम आर्ट्स येथे रेडियमचे काम करतात. गुरवारी (दि.23) मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ते दुकानात काम करत असताना आरोपी बरोबर झालेल्या किरकोळ भांडणातून आरोपीने मागून येत त्यांच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जखमी शाकिब यांनी दुकानाबाहेर धावत जाऊन हल्लेखोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार आणि पावसामुळे आरोपी पसार झाला. काही अंतर गेल्यानंतर डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात आल्याने ते पुन्हा दुकानात आले. त्यावेळी दुकानातच हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली वस्तू पडलेली आढळली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मीनाक्षी माळी, पोलीस हवालदार प्रवीण पवार, पोलीस नाईक शशिकांत काकडे आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे आरोपी नाविद आरिफ शेख (28) व्यवसाय – इलेक्ट्रिशियन, रा. वडघर, पनवेल हा पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात लपला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Exit mobile version