| पनवेल । वार्ताहर।
ट्रेलरचे चाक बदली करण्याचे काम करण्यासाठी ट्रेलरच्या चाकाखाली गेलेल्या तरुणाच्या अंगावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कळंबोलीतील आर. के. गॅरेजमध्ये घडली आहे.
कळंबोली पोलिसांनी या घटनेतील ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून, ओमकार सत्रे (18) असे त्याचे नाव आहे. तर, या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद आले शेख (19) असे आहे. ओमकार हा ट्रेलरचे चाक बदली करण्यासाठी कळंबोलीतील फूड – लँड ब्रिजजवळील गॅरेजमध्ये गेला होता. यावेळी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मोहम्मद याने ट्रेलरच्या डाव्या बाजूची पाठीमागील पहिली दोन चाके काढून त्या ठिकाणी नवीन चाके बसवली. त्यानंतर तो ट्रेलरच्या खाली लावण्यात आलेला जॅक काढण्यासाठी ट्रेलरच्या खाली गेला असताना ओमकार सत्रे याने ट्रेलर चालू केला. त्यामुळे ट्रेलरचे चाक मोहम्मदच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला व काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.