| छ. संभाजीनगर | प्रतिनिधी |
छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या लोहमार्ग पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान शनिवारी (दि.21) एक दुदैवी घटना घडली. मैदानी चाचणी सुरू असताना सांगली जिल्ह्यातील एका 23 वर्षीय उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील मोराळे येथील संग्राम धोंडीराम शिंदे (23) हा तरुण पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आला होता. टीव्ही सेंटर भागातील गोकुळ मैदानावर शनिवारी सकाळी लोहमार्ग पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होती. मैदानी चाचणीसाठी मैदानात उतरल्यानंतर काही वेळातच संग्रामला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळ न घालवता त्याला रुग्णवाहिकेतून शासकीय घाटी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक स्तरावर सांगण्यात येत आहे.





