। उरण । वार्ताहर ।
उरणमध्ये 21व्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या युवा महोत्सवाचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उरणकरांसाठी सिडकोकडून मैदानाच्या जागेसाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांची लवकरच बैठक बोलावून मैदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले. दरवर्षी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजित करण्यात येते. या वर्षीही दि.2 ते दि.16 जानेवारी असे सलग पाच दिवस 21व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बोकडवीरा येथील नवी मुंबई सेझ मैदानावर रविवारपासून सुरू झालेल्या या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी 132 हून अधिक प्रकारातील विविध स्पर्धांचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावर मा.आ.मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, उपाध्यक्ष मनोज पडते आदी पदाधिकारी, खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते.