। मुंबई । प्रतिनिधी ।
पुण्यातील एका तरुणाने अटल सेतू पुलावरून थेट समुद्रात उडी मारल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटल सेतू पुलावरून एका तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. प्रतीक सुभाष रासकर (28) असे या तरुणाचे नाव असून तो पुणे येथे शिरूर तालुक्यात राहणारा आहे. त्याने मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.
प्रतीक रासकर हा शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित काम करत असून, तो शिरूर तालुक्यातील रहिवासी आहे. तथापि, या घटनापूर्वी या तरुणाने कुटुंबीयांना ‘बाहेर जेवायला जातो,’ असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, त्यानंतर त्याने आपली कार अटल सेतूवर थांबवून समुद्रात उडी मारली. समुद्रात उडी मारल्यानंतर या तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागला नसून पोलीस पथकाकडून तपास सुरु आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोलीस आणि संबंधित यंत्रणा दाखल झाल्या. या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून, तरुणाची युद्धपातळीवर शोधमोहीम सुरु आहे. तथापि, अटल सेतूवरून उडी मारण्याच्या या घटनेमुळे पुलाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
Suicide News: अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी
