| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतल्या भांडुपमध्ये विचित्र अपघाताची घटना घडली आहे. भांडुपच्या एलबीएस मार्गावर हा अपघात झाला. चालक नसलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये स्कूटीचालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भांडुपमध्ये खळबळ उडाली आहे. भांडुप पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपच्या एलबीएस मार्गावर एक विचित्र अपघातात झाला. स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या साजिद आजमी या तरुणाचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. साजिद आजमी हा त्याच्या दोन मित्रांसह मध्यरात्रीच्या सुमारास स्कुटीवरून आईस्क्रीम खाण्यासाठी मंगतराम पेट्रोल पंप परिसरात गेला होता. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर हे सर्वजण घरी परतत असताना अपघात झाला. रत्याच्या कडेला उभा असलेला टेम्पो अचानक त्यांच्या दिशेने येताना त्यांनी पाहिले. या टेम्पोमध्ये चालकच नव्हता तेव्हा साजिदच्या दोन्ही मित्रांनी स्कुटीवरून उडी मारली. पण साजिदचा पाय स्कुटीमध्ये अडकल्यामुळे या टेम्पोने त्याला चिरडले. त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. परंतू, त्याला डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले. भांडुप पोलिसांनी या संदर्भात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.