ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यशोगाथा; आयआयटी प्रवेशसाठी पात्रता संपादन
| माणगाव | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही जागतिक दर्जाची क्षमता दडलेली असते, याची प्रचिती पुन्हा एकदा निजामपूर येथील युगंधर शशिकांत गांगण याने आपल्या उल्लेखनीय यशातून दिली आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या सामान्य कुटुंबातील या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जेईई ॲडव्हान्सड परीक्षेत यश मिळवत भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये आयआयटी प्रवेशासाठी पात्रता संपादन केली आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल निजामपूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाने विशेष अभिनंदनाचा ठराव एक मताने मंजूर करून युगंधरचा सत्कार केला. युगंधरच्या या यशामागे त्याचे वडील शशिकांत गांगण, आई गीता गांगण, शिक्षकवृंद तसेच विद्यालयाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
निजामपूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभागृहात सोमवारी (दि.29) संस्थेचे अध्यक्ष दत्तू पवार यांच्या अध्यक्षते खाली पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष पवार यांच्या हस्ते युगंधर गांगण याचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याचे यश प्रेरणादायी असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष पवार यांनी व्यक्त करीत कठोर परिश्रम, आत्मविश्वास मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये यशस्वी होऊ शकतात, हे युगंधरने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिल्याचे गौरवोद्गार काढले. सत्कार सोहळ्याला हमजा अ. जालगांवकर, दत्ताराम नाडकर, सुधीर पवार, दिगंबर जोशी, संदीप मोदी, रहिमत परदेशी, नितीन बडे, रसिक मेथा, गणेश पवार, हुकुमचंद जोशी, संपदा महाळुंगे, हुकुमचंद जोशी, संपदा महाळुंगे, गणेश नाडकर, रविकांत अडविलकर, महेंद्र नाडकर, रमेश नाडकर, अशोक नाडकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
