| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवण्यासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी घोषित केलेल्या यादीत युवा उमेदवारांना संधी देण्याला प्राधान्य देण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकारणात यावेळी चुरस वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे.
रायगडामध्ये एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये पनवेल, उरण, कर्जत-खालापूर, पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड-पोलादपूर यांचा समावेश आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात पुन्हा एकदा अदिती तटकरे यांना उतरवले आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. पण, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून या ठिकाणी निवडणूक लढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचे मुख्यालय असणार्या अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाने चित्रलेखा पाटील यांना संधी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून महिला आघाडीचे काम त्या पाहात आहेत. त्या मतदारसंघात त्यांनी या अगोदरपासूनच तयारी केली आहे. पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी अखेर चित्रालेखा पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या रूपाने तरुण उमेदवार अलिबाग विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे. या अगोदर दिवंगत माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवली होती. त्यांच्यानंतर चित्रलेखा पाटील यांच्या रूपाने पक्षाने महिला उमेदवार या ठिकाणी दिला आहे. त्यांची लढत विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्याशी निश्चित झालेली आहे. त्याचबरोबर महाड विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल यांना उमेदवारी दिली आहे. त्या या अगोदर काँग्रेस पक्षात होत्या महाडचे नगराध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. मशाल चिन्हावर रिंगणात उतरलेल्या स्नेहल जगताप या प्रतिस्पर्धी उमेदवार भरत गोगावले यांच्यापेक्षा तरुण आहेत. त्यामुळे मतदार नेमके कोणाच्या पारड्यात मत टाकतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पेण विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री रवीशेठ पाटील यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्षाने दंड थोपटले आहे. शेकापने अतुल म्हात्रे हा नवीन चेहरा पुढे आणला आहे. रवीशेठ पाटील हे सत्तरीच्या घरामध्ये आहेत. त्यामुळे ज्येष्ठ विरुद्ध तरुण अशा प्रकारची लढत या ठिकाणी होणार आहे. मतदार नेमके कोणाला निवडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कर्जत या ठिकाणी पन्नाशी पार केलेल्या आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने नितीन सावंत यांच्या रूपाने तरुण चेहरा मैदानात उतरवला आहे. त्या ठिकाणीसुद्धा काटे की टक्कर अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे पिछाडीवर होते. त्यामुळे या निवडणुकीत उबाठा आणि पर्यायाने सावंत यांच्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत.
प्रीतम म्हात्रे उरणमधून रिंगणात
उरण विधानसभा मतदारसंघात माजी आमदार मनोहर भोईर हे तुलनेत ज्येष्ठ आहे. विद्यमान आमदार महेश बालदी 57 वर्षांचे आहेत. ते तिसर्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाने तरुण प्रयोग केला आहे. या ठिकाणी प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी देत आजी-माजी आमदारांसमोर आव्हान उभे केले आहे. भोईर आणि बालदी यांच्या तुलनेत म्हात्रे हे अधिक तरुण आहेत. परिणामी, तरुणांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रायगडात तीन मतदारसंघात महिलांना संधी
दक्षिण रायगडमध्ये तिन्ही विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. श्रीवर्धनमधून अदिती तटकरे निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर अलिबाग विधानसभा मतदारसंघात चित्रलेखा पाटील यांच्या रूपाने आणखी एक रणरागिणी मैदानात उतरली आहे. त्याचबरोबर महाडच्या कन्या स्नेहल जगताप यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. या तिन्ही महिला उमेदवार तरुण आहेत.
पनवेलमध्ये बाळाराम पाटलांचे पारडे जड
शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांना शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी दिली असून, त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, शिक्षक मतदारसंघाचे आमदार म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.