खेळाडूंना शून्य कचर्‍याचे धडे

| नवीन पनवेल । वार्ताहर ।

पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड अंतर्गत पनवेल महापालिका जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्याच अंतर्गत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीत क्रिकेटचे सामने सुरू आहेत. या सामन्या दरम्यान ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022-23’ व माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभागाच्यावतीने अंतर्गत शून्य कचरा उपक्रम राबवण्यात आले. या वेळी उपस्थित खेळाडू व विद्यार्थ्यांना ओला व सुका कचरा वर्गीकरण, होम कम्पोस्टिंग, प्लास्टिकचे तोटे; तसेच शालेय विद्यार्थ्यांना पासबुक सेवा या नवीन उपक्रमाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022-23’ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. पनवेल शहराच्या स्वच्छतेवर महापालिकेने विशेष लक्ष दिले आहे. विशेषतः स्वच्छता हा नागरिकांच्या सवयीचा भाग व्हावा, लोकांमध्ये जनजागृती वाढावी, यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत आहे. ‘शून्य कचरा उपक्रम’ हा त्याचाच एक भाग आहे. पनवेल शहर स्वच्छ व सुंदर व्हावे; राज्यातच नव्हे तर देशातील सुंदर शहरांमध्ये पनवेलचा समावेश व्हावा, यासाठी पालिकेच्यावतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहे. या अभियानामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे. यासाठी विविध माध्यमांचा वापरही केला जात आहे. या वेळी सहायक आयुक्त डॉ. वैभव विधाते, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छता निरीक्षक जयेश कांबळे, स्वच्छता निरीक्षक मिथुन पवार; तसेच कर्नाळा स्पोर्ट कॅडमीचे सर्व शिक्षक व खेळाडू संघ उपस्थित होते.

Exit mobile version