| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत वापरण्यास धोकादायक असल्याने ती खाली करण्यात आली आहे. विविध विभाग इतरत्र स्थलांतरीत करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेवर सध्या प्रशासकाची हुकूमत असल्याने त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा बंगला ताब्यात घेतला आहे. याच बंगल्यातून त्यांनी जिल्ह्याचा कारभार हाकण्यास सुरुवात केली केली आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय शोधताना मात्र सर्व सामान्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शिवतिर्थ इमारत तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर उर्फ भाऊ पाटील यांनी बांधली होती. इमारतीवर त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास चितारला आहे. त्यामुळे राज्यभरात या शिवतिर्थ इमारतीबाबत सर्वांच्याच मनात आपरुप होते. राज्याच्या विविध भागातून इमरात पाहण्यासाठी नागरिक आजही गर्दी करताना दिसून येतात. सदरच्या इमारतीला 35 वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. काही ठिकाणी इमारतीची पडझड झाली आहे. त्यामुळे इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार हि इमारत वापरण्यास धोकादायक असल्याचे अहवाल देण्यात आला होता.
इमारत धोकादायक असल्याने तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी इमारतीमधील तब्बल 14 विभाग विविध ठिकाणी स्थलांतरित केले होते. अलिबाग पंचायत समितीची इमारत, जिल्हा रुग्णालया शेजारील जागेत, तसेच काही विभाग हे कुंटेबाग या ठिकाणी स्थलांतरित केले. जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाकडे जाऊन एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भरत बास्टेवाड हे कारभार पहात आहे. त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे निवासस्थान हेच आपल्या कामकाजाचे केंद्र बनवले आहे. जिल्ह्याचा कारभार ते येथूनच हाकलत आहेत. यासाठी त्यांनी बंगल्यामध्ये विशेष असे काही बदल केलेले नाहीत. बंगल्याच्या किचनमध्ये स्वीय सहायकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. तर स्वतः बास्टेवाड हे बंगल्याच्या हॉसमध्ये बसत आहेत.
कुंटे बागेत शुकशुकाट
विविध कामानिमीत्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने नागरिक अलिबागला येत असतात. परंतु जिल्हा परिषदेची विखुरलेली कार्यालये शोधताना मात्र त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, पाणी पुरवठा, समाज कल्याण, ग्रामपंचायत अशी महत्वाची कार्यालये कुंटे बागेत आहेत. ती शोधताना नागरिकांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे. कार्यालय कोठे आहे याची माहिती नसल्याने नागरिकांची गर्दी कमी असते. त्यामुळे कुंटे बागेत कायम शुकशकाट दिसून येतो.
नवीन इमारतीसाठी 130 कोटी
नव्याने इमारत बांधण्यासाठी 103 कोटी रुपयांची मान्यता सरकारने दिलेली आहे. तसेच नंतर लागेल तसा निधी मिळणार आहे. इमारत बांधून पूर्ण होण्यासाठी सात-आठ वर्षाचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंटेबागेत असलेल्या अन्य जागेचा चांगला वापर करुन तेथेच सध्या चांगली इमारत बांधावी असा सल्ला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसह अन्य लोक प्रतिनिधींनी दिल्याचे भरत बास्टेवाड यांनी सांगितले.