| पेण | प्रतिनिधी |
पेण खाटीक मोहल्ल्यात भूषण इलेक्ट्रानिक्स दुकानात अनवधानाने विसरलेल्या सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी समीर हनुमान पाटील, रा. रोडे याला अटक केली आहे.
दुकानाचे मालक भूषण कडू यांनी सोन्याचा हार एका डबीतून दुकानात आणला होता. ती डबी काऊंटरवर ठेवून ते कामात मग्न झाले. थोड्यावेळाने त्यांना हाराची आठवण झाली पण त्यावेळी ती डबी तिथे न सापडल्याने त्यानी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दुकानाती सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यात समीर पाटील हा संशयित आढळला. त्याला रोडे येथील राहत्या घरातून ताब्यात घेत तो सोन्याचा हारही जप्त केला. बाजारात त्याची किंमत 83,300 रूपये इतकी आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. हा गुन्हा उघड करण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली तपासणी हवलदार प्रकाश कोकरे, सचिन वसकोटी, अमोल म्हात्रे, सुनिल जाधव, यांनी विशेष प्रयत्न करून गुन्हा घडल्या नंतर 12 तासाच्या आतच आरोपीला बेड्या ठोकल्या.