| रसायनी | वार्ताहर |
घरकुल योजनेचा लाभ मिळावा, म्हणून खोटे कागदपत्र शासनाला सादर करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा वाहक अनिल कानू गायकवाड (रा.तुपगाव बौध्दवाडी ता.खालापूर विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल गायकवाड हे राज्य परिवहन महामंडळ कर्जत आगार येते वाहक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख 35 हजार 720 रुपये एवढे असताना तहसिल कार्यालय खालापूर येथे त्याने त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 45 हजार रुपये एवढे कमी असल्याचे खोटे बनावट प्रतिज्ञापत्र नोंदवून घेतले. त्याचा वापर करुन तहसिल कार्यालयाकडून खोटा व बनावट उत्पन्नाचा दाखला प्राप्त करुन हा उत्पन्नाचा दाखला खोटा व बनावट आहे हे माहित असताना जाणीवपूर्वक राज्यपूर्वक राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना सन 2017-2018 अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पंचायत समिती खालापूर येथे अर्ज केला. अर्जासोबत हा खोटा व बनावट उत्पन्नाचा दाखला सादर केला. शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन घरकुल योजना मंजूर करुन घेऊन त्यापोटी शासनाकडून 1 लाख 20 हजार रुपये रक्कमेच अनुदान प्राप्त करुन शासनाची फसवणूक केली. याबाबत शहानिशा करून पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रभाकर बोरकर यांनी खालापूर पोलीस ठाण्यात अनिल गायकवाड विरुद्ध तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी करीत आहेत.