सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात ई-निविदा प्रक्रियेतील त्रुटी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी समोर आणल्या होत्या. त्याबाबतचे वृत्त कृषीवलने प्रसिद्ध केले होते. ही बाब संजय सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या निदर्शनास आणून दिली होती. अखेर त्या निविदेतील त्रुटी दूर करुन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने नवी निविदा काढली आहे.
संजय सावंत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानूसार 50 लाखांच्या कामासाठी निविदा फी रुपये रू.5 हजार 700 व अनामत रक्कम रुपये 95 हजार रुपये घेणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित विभागाने निविदा फी रुपये 1 हजार व अनामत रक्कम रुपये 50 हजार ठेवली होती. 1/12/2016 रोजीच्या शासन निर्णयानूसार 50 लाखापर्यंतच्या निविदेसाठी फी 3000 होती. तसेच तेव्हापासून दरवर्षी 300 प्रमाणे वाढ करण्यात यावी, असा उल्लेख शासन निर्णयामध्ये आहे. त्याप्रमाणे नऊ वर्षाचे 2700 रुपये व मुळ निविदा फी 3000 अशी एकूण 5 हजार 700 फी असणे अपेक्षित होते. तर अनामत रक्कमेसाठी 50 हजार रुपये रक्कम ठरविण्यात आली असून दरवर्षी 5 हजार याप्रमाणे 9 वर्षाचे 45 हजार रुपये नियमाप्रमाणे होत असून आता अनामत रक्कम 95 हजार रुपये असणे अपेक्षित होते. मात्र, अधिकार्यांनी 2016 चेच दर ठेवल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
अखेर त्या वादग्रस्त निविदेतील त्रुटी दूर करुन महिला व बालकल्याण विभागाने नव्याने निविदा काढली आहे. त्यामध्ये सावंत यांनी निदर्शनास आणलेल्या रक्कमा निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने सावंत यांच्या तक्रारीची दखल घेत दुरुस्ती केल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.