। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील शेखाचे गावातील एका व्यक्तीने कौटुंबिक नैराश्येपोटी शुक्रवारी सायंकाळी स्वतःला जाळून घेतल्याचा प्रकार घडला. यामध्ये गंभीर भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र राजाराम पाटील (45) असे या मृत व्यक्तीचे नाव असून, तो तालुक्यातील शेखाचे गाव येथील रहिवासी आहे. मोलमजुरी हा त्याचा व्यवसाय होता. मागील काही महिन्यांपासून मयत मच्छिंद्र त्याच्या पत्नीपासून वेगळा राहात होता. तो आणि त्याचा मुलगा असे दोघेजण नारंगी येथे राहात होते. मुलाचे एक महिन्यापूर्वी लग्न झाले आहे. मात्र, मयत याला दारु पिण्याची सवय असल्याने तो दारु पिऊन घरात वाद घालत होता. अखेर त्याचा मुलगा, सून हे दोघेजण कंटाळून पुन्हा त्याच्या आईकडे राहण्यास गेले. याचा राग मनात धरून शुक्रवारी (दि.28) सायंकाळी त्याने दारुच्या नशेत अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला घरात पेटवून घेतले. त्याला अलिबागमधील जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले.