| पनवेल | वार्ताहर |
धुळे येथे राहणार्या एका 30 वर्षीय तरुणाने कल्याणमध्ये राहणार्या एका 38 वर्षीय विवाहितेसोबत फेसबुकवरून मैत्री करून विवाहितेचे व्हिडिओ तिच्या पतीला व मुलांना दाखवण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने या विवाहितेकडून दीड लाख रुपयांची रक्कमसुद्धा उकळल्याचे उघडकीस आले आहे. सय्यद आवेज (30) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील 38 वर्षीय पीडित विवाहिता आपल्या कुटुंबासह कल्याण येथे राहते. तर आरोपी सय्यद आवेज धुळे येथे राहण्यास आहे. 2022 मध्ये आरोपी सय्यद आवेजने पीडित महिलेसोबत फेसबुकवरून मैत्री केली होती. त्यानंतर त्याने फेसबुकद्वारे पीडित विवाहितेला मॅसेज करून तिचा मोबाइल नंबर मिळवला होता. त्यानंतर आरोपीने पीडित विवाहितेसोबत बोलण्यातून विश्वास संपादन करून तिला व्हीडीओ कॉल करून तो व्हिडीओ कॉल मोबाइल फोनवर रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ पती व मुलांना पाठवण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सय्यदने विवाहितेवर पनवेल येथील लॉजवर अत्याचार केले होते. त्यानंतरही आरोपीने अनेकदा पीडितेवर अनेकवेळा अत्याचार केले. तिच्याकडून दीड लाख रुपयेही उकळले. त्यानंतरही आरोपीचे ब्लॅकमेल करणे सुरूच होते. अखेर पीडितेने पनवेल शहर पोलिस ठाण्यात सय्यदविरोधात तक्रार दाखल केली.