| नेरळ । वार्ताहर ।
जिल्ह्याच्या पूर्व भागाचे प्रवेशद्वार असलेल्या झुगरेवाडी शाळेतील इमारतीचे बांधकाम ज्या पद्धतीने करण्यात आले आहे, त्या सुसज्ज इमारतीबद्दल जिल्हा परिषदेला निश्चितच अभिमान वाटत राहणार आहे. असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी रोटरी क्लब मुंबई वरळी यांनी लोकसहभागातून उभारलेल्या दुमजली इमारतीचे उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी महारष्ट्र विधानपरिषद माजी आ. दिगंबर विशे, रोटरीचे मुंबई डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप अग्रवाल, शिक्षण विभागाच्या उपसंचालक डॉ नेहा बेलसरे, जिल्हा शिक्षण अधिकारी डॉ. पूनित गुरव, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, आदिवासी विकास विभागाचे पेण प्रकल्पाचे माजी अध्यक्ष संजय सावळा, तालुका गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे, विक्रम अडसूळ, सचिन संघवी, जयेश रुपारेल, दीप्ती राजडा, निमेश सिंघरिका, कविता गोडबोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या कुटुंबाला सांभाळत आमचे कर्मचारी झपाटल्यागत काम करीत आहेत. त्यातून निर्माण झालेले काम त्यामुळे जिल्हा परिषदेची मान निश्चित अभिमानाने वर जावू शकते असे डॉ. पाटील म्हणाले. तसेच जिल्ह्यात सामाजिक संस्था काम करीत असून त्यांच्या समावेशामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागत आहे, याबद्दल देखील डॉ. पाटील यांनी सर्व स्वयंसेवी संस्था यांचे आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दफ्तर,पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.