समीर येरूणकर यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची उपस्थिती असलेल्या जांभूळवाडी येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक समीर तानाजी येरूणकर यांना रायगड जिल्हा परिषदेचा 2021चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी रायगड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली.

तालुक्यातील वदप गावात गेली 15 वर्षे यशस्वी रक्तदान शिबिर आयोजन करणारे, गावातील तरुणांसाठी सात लाख रुपयाचे व्यायाम साहित्य मिळवून दिले आहे. कबड्डी मार्गदर्शक, सूत्रसंचालक तसेच, विद्यार्थी आणि शाळेसाठी अनेक सेवाभावी संस्थांकडून मदत मिळवून देणारे समीर येरुणकर हे तालुक्यातील वदप गावातील रहिवासी आहेत.

तालुक्यातील जांभुळवाडी सारख्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे काम येरुणकर यांनी केले आहे.तंत्रस्नेही शिक्षक,उत्तम चित्रकार, उत्तम वक्ता, राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघास सुवर्णपदक मिळवून देणारे, तालुका क्रीडा समन्वयक, राष्ट्रीय कबड्डी पंच,आणि राज्य हॉलीबॉल पंच असून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे रायगडचे उपाध्यक्ष म्हणून शिक्षकांचे अनेक प्रश्‍न सोडविण्यात त्यांनी आघाडी मिळविली आहे.कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह तर कर्जत तालुका हॉलीबॉल असोसिएशनचे सहकार्यवाह म्हणून काम पाहत आहेत.

Exit mobile version