नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी मान्य
। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली वसाहत परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणी तातडीने करावी अशी मागणी स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत कळंबोली वसाहतीमध्ये लोंबकळत असलेल्या वृक्ष व त्याच्या फांद्या छाटणी कामाला सुरूवात झाली आहे.
कळंबोली प्रभाग क्र.10 सेक्टर 1 ई काळभैरवनाथ मंगल कार्यालय ते सुधागड स्कूल सेक्टर 2 गार्डन तसेच सेक्टर 3 हनुमान मंदिर येथील धोकादायक वृक्षांच्या फांद्यामुळे एखादी दुर्घटना अपघात होवू शकतो. त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. तसेच विद्युत वाहिनी तुटून विद्युत पुरवठा सुद्धा खंडीत होतो. नुकताच पावसाळा सुरू झाला असल्याने आगामी काळात धोका लक्षात घेवून या झाडांच्या फांद्या छाटून टाकण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक रवींद्र भगत यांनी केली होती. या मागणीची दखल घेत सदर काम सुरू करण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांनी नगरसेवक रवींद्र भगत यांचे आभाार मानले आहेत.