कोरोना लस पुरवठ्यात जिल्हा प्रशासनाचा भेदभाव; भांडवलदारांना मात्र लसींचा साठा उपलब्ध
। रोहा । जितेंद्र जोशी ।
रायगड जिल्ह्यात येणार्या अपुर्या लसींच्या साठ्यामुळे गतिमान लसीकरणाला ब्रेक लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण सामान्यांना उपलब्ध नसणारी लस भांडवलदारांसाठी मात्र सहज उपलब्ध करून दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सर्वसामान्य जनतेच्या जीवाची पर्वा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य नागरिक दररोज लस आली का, हे पाहण्यासाठी लसीकरण केंद्रांवर फेर्या मारून दमला आहे. सामान्य जनतेचे लसीकरण गतिमान करण्याऐवजी रायगड जिल्हा परिषद प्रशासन भांडवलदारांसोबत आर्थिक हितसंबंध जोपासत आहे. लस वितरणाच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. मात्र त्यांचे लस पुरवठ्याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते.
देशातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण झाल्याशिवाय कोरोनाला आळा बसू शकत नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. अर्थचक्र गतीमान करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचे गतीमान लसीकरण होणे देखील गरजेचे आहे. जिल्ह्यातील विविध औद्योगिक आस्थापना आपल्या कर्मचार्यांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण मोहिम राबवित आहेत. पण सर्वसामान्य नागरिकांना मात्र शासनामार्फत होत असलेल्या लसीकरणावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक शासकीय लसीकरण केंद्रांवर आठवड्यातील केवळ दोन ते चार दिवस लसीकरण होत असल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागत आहे.
जिल्ह्यातील लसीकरण आकडेवारीचा आलेख कोविन प्रणालीवर जाऊन पाहिले असता हा आलेख स्पष्ट दाखवत आहे की, मागील 30 दिवसांत 4, 5 व 26 जून हे तीन दिवस वगळता एकही दिवस 10 हजारापेक्षा अधिक लसीकरण झालेले नाही. रायगडचे अर्थकारण उद्योगधंद्यांप्रमाणेच पर्यटन व्यवसायावर देखील अवलंबून आहे. जिल्ह्यातील अर्थकारणाला गतिमान बनविण्यासाठी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.
या मधील महत्वाची गोष्ट म्हणजे 29 जून या एका दिवसात जिल्ह्यात 2308 जणांचे लसीकरण झाले; पण यापैकी खासगी केंद्रांवर झालेल्या लसीकरणाची आकडेवारी 1850 पेक्षा अधिक आहे. यातून हेच दिसून येते की, रायगड जिल्हा प्रशासनाला सामान्य जनतेच्या लसीकरणापेक्षा भांडवलदारांचे हित जपण्यात अधिक रस आहे.
याबाबत डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी फोन उचलण्यास टाळाटाळ केली. तसेच मेसेजद्वारे उत्तर देत अत्यंत तपशीलवार तर्कसंगत, न्यायपूर्ण आणि योग्य कार्यपद्धतीचे अनुसरण केले जात आहे, यावर चर्चा केली जाऊ शकत असल्याचे सांगितले. त्यामुळे भांडवलदारांसोबत आर्थिक हितसंबंध जोपासणार्या अधिकार्यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
साडेपाच लाखांपैकी 99 हजार नागरिकांना मिळाला दुसरा डोस
आजपर्यंत 5,34,375 नागरिकांना पहिला डोस तर दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या केवळ 99 हजार इतकीच आहे. 29 जून रोजी जिल्ह्यात केवळ 2 हजार 300 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.हे पाहता पुन्हा एकदा लसीकरणाचा खेळखंडोबा जिल्ह्यात चालू असल्याचे दिसून येत आहे.
12 खासगी केंद्रात लस उपलब्ध
जिल्ह्यात एकूण 217 लसीकरण केंद्रे असून त्यापैकी 17 खासगी आहेत. 29 जून रोजी झालेल्या लसीकरणाकडे दृष्टिक्षेप टाकला असता असे दिसून येते की, बेकबेस फूड्स, रेडीसन रिसॉर्ट अलिबाग, ट्री हाऊस, रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, सुदर्शन केमिकल्स, पटवर्धन निवास, आसही ग्लास, एशियन पेंटस, सीसीई एकट्रेक, डीएचए रिलायन्स, रिलायन्स नागोठणे, लाईफलाईन हॉस्पिटल या 12 खासगी लसीकरण केंद्रांना लस पुरवठा झाला आहे. जिल्ह्यातील 17 पैकी 12 खासगी लसीकरण केंद्रांना मोफत लस पुरवली जात असल्याने सामान्यांना लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
खासगी कंपन्यांना असा कोणताही लस पुरवठा करण्यात आला नाही. त्या-त्या उद्योग समुहातर्फे लस विकत घेऊन कर्मचार्यांना त्याचा पुरवठा केला जात आहे. आरोग्य विभागाकडून सरकारी केंद्रावरच पुरवठा केला जातो.
डॉ. सुधाकर मोरे, आरोग्य अधिकारी