। पेण । प्रतिनिधी ।
पेण येथील पोषण आहारातील उंदीर प्रकरण ताजे असतानाच शनिवारी (दि. 15) पुन्हा एकदा ठेकेदाराकडून कालबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आला. परंतु, मध्यान्ह भोजन आहार तयार करणार्या ठेकेदारांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार्या प्रशासनाविरोधात पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कर्जत येथील सबठेकेदार सचिन देशमुख यांच्यामार्फत पेण येथे मध्यान्ह भोजन आहाराचे सामान पोहोच करण्यात येते. मात्र, शनिवारी आलेल्या सामानामध्ये हळद, मीठ, मिरची पावडर यांचे पॉकीट मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. ठेकेदाराने ही बाब निर्दशनास आणून दिल्यानंतर पुरवठा करणार्या ठेकेदाराने बदलून देतो, तक्रार करू नका, अशी विनंती केली. मात्र, ‘कृषीवल’च्या प्रतिनिधीने यामध्ये हस्तक्षेप करून सबठेकेदार सचिन देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून झालेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, मी सबठेकेदार आहे, मूळ ठेकेदार हा जळगावचा असून, साई मार्केर्टिंग या नावाने पोषण आहाराचे सामान पुरविले जाते. पुढे त्याने अक्कलेचे तारे तोडत चुकून पॅकेट पडले असतील, ते बदलून देतो, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समाजसेवक हरेश बेकावडे तेथे पोहोचले. त्यांनीदेखील मध्यान्ह भोजन आहारामध्ये वापर असलेल्या पदार्थांवर आपले मत मांडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.