भालाफेकीत भारताला सुवर्ण
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी सुवर्णमय कामगिरी करीत या स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.त्याच्या या सुवर्णमय फेकीचे देशवासियांनी जल्लोषात स्वागत केले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.यानिमित्ताने ऑलिम्पिकच्या मैदानावर प्रथमच जन- गण-मनची धून वाजविण्यात आली.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत 7 पदके जिंकले आहेत. नीरजने 87.58 चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
भाला फेकण्याच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात 87.03. मीटर लांब भाला फेकला. दुसर्यांदा त्याने 87.58 मीटर अंतर कापले. भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नाही तर हे अॅथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे.
नीरजसह 12 स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.