। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील मोर्बे धरणात अंघोळ करण्यासाठी उतरलेल्या एका आदिवासी शेत मजूराचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.23) घडली. नवी मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणार्या मोर्बे धरणात हिर्या महादू भला (रा. तिनघर ठाकूरवाडी वय 49) या इसमाचा बुडून मृत्यू झाला.
हा शेतकरी धरणाच्या वरील भागातील रानात जळणासाठी सरपण आणण्यासाठी आपली पत्नी हिरासह गेला होता. तिथून तो आल्यावर मोर्बे धरणाच्या काठावर पत्नीसह बसला होता. घर जवळच असल्याने तो मोर्बे धरणाच्या कडेला हातपाय धुण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो चिखलात रुतला. ही बाब पत्नीच्या लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा केला असता स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्याला पाण्याच्या बाहेर काढला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
ही बाब चौकचे सहाय्यक पोलिस निरिक्षक युवराज सूर्यवंशी यांना समजताच पोलीस हवालदार प्रसाद पाटील, पोलीस महेश खंडागळे यांनी त्याला चौक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक युवराज सूर्यवंशी करीत आहेत.